। नेरळ । प्रतिनिधी ।
सद्गुरू वामनराव पै यांनी उभारलेल्या कर्जत वैजनाथ तेथील जीवनविद्या ज्ञानपीठमध्ये नाम धारकांचा आनंद मेळावा सुरू झाला आहे. आठ दिवस चालणार्या या आनंद मेळाव्याची सुरुवात जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रकट मुलाखतीतून झाली. दरम्यान, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी अध्यात्माची गरज असल्याचा सल्ला प्रल्हाद वामनराव पै यांनी नामधारकांना दिला.
कर्जत तालुक्यातील वैजनाथ गावी सद्गुरू वामनराव पै यांनी उभारलेल्या जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये नामधारकांचा आनंद मेळाव्याला 24 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जतमधील जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये 24 ते 29 नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून हजारो शिष्यमंडळी सहभागी होत आहेत. दररोज दोन पर्वात विविध उपक्रमांचे आयोजन या कार्यक्रमांर्तगत करण्यात येणार आहेत. 24 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळच्या सत्रात ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, संगीत जीवनविद्या, दिव्य अनुभूती देणारी मानसपूजा, मानसिक शांतता देणारी शरीरसाधना, कृतज्ञतापूर्वक करण्यात आलेले गुरुपूजन अशा विविध उपक्रमांचे आयेजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जेष्ठ नामधारक दिलीप कुलकर्णी आणि ज्येष्ठ प्रबोधक विश्वनाथ कामत यांना या वर्षाचा जीवनगौरव पुरस्कार प्रल्हाद पै यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.