। नेरळ । प्रतिनिधी ।
पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुधन पंधरवडा अभियान राबविले जात आहे. कर्जत तालुक्यातील सर्व पशु वैद्यकीय दवाखान्यात हे अभियान राबविले जात असून शेतकर्यांचा या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पशुधन पंधरवडा मध्ये सर्व गोवंशीय जनावरे यांची आरोग्य तपासणी करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
त्या दृष्टीने पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत हे अभियान राबविले जात आहे. तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत गावातील शिबिरांमध्ये जनावरांची आवश्यक आरोग्य तपासणी, जंतनिर्मूलन,औषधउपचार,लसीकरण,गर्भधारणा तपासणी,वंध्यत्व निवारण तपासणी व इतर केले जात आहे.तसेच पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, उप्रक्रम, लसीकरण मोहीम, जंतनिर्मूलनचे महत्व, इतर तांत्रिक सेवा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कर्जत येथे या पशुधन पंधरवडा मोहिमेचा शुभारंभ जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉ. गिरीश बारडकर, कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे व पशूधन विकास अधिकारी, पंचायत समिती विस्तार अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शना खाली कर्जत तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने हे पशुसंवर्धन पंधरवडा अंतर्गत विविध मोहिमा राबवत आहेत. पशुसंवर्धन पंधरवाडा अभियान हे कर्जत तालुका लघुपशु वैदयकिय सर्व चिकीस्त्यालय व कर्जत तालुक्यातील जि.प. स्तर चे 16 पशुवैद्यकीय दवाखाने यांच्यामार्फत रबिविले जात आहे.