पनवेलमध्ये तरुणाईचा एल्गार

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

नीट परीक्षा प्रकरणातील कथित गैरव्यवहार तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पनवेलमध्ये तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या मोर्चाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण-तरुणी आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन त्यांनी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बळाचा वापर न करता संवादातून तोडगा काढण्याची मागणी केली. तसेच, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी योग्य पावले उचलावीत, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली.

Exit mobile version