चिऊताईंच्या प्रचारार्थ बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्रलेखा पाटील यांचे मतदारांकडून जल्लोषात स्वागत

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचार्थ अलिबाग शहरामध्ये रविवारी (दि. 17) सायंकाळी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला मतदार व कार्यकर्त्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. चिऊताई यांचे शहरामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, घोषणा व शिट्टीच्या आवाजाने संपुर्ण अलिबाग दुमदूमून गेला. प्रचार रॅलीदरम्यान शहरातील महिलांकडून चिऊताईंचे औक्षण करण्यात आले.

1 / 6

शेतकरी भवन येथून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली ठिकरूळ नाका, खोजनी नाका, मांडवी मोहल्ला, जलसा पाडा, शास्त्रीनगर, सिध्दार्थ नगर, बाजारपेठ मार्गे, मारुती नाका, अर्बन बँक, अरुणकुमार वैद्य हायस्कूल, कन्याशाळा, राम मंदिर ब्राह्मणआळीकडून रामनाथ गावदेवी मंदिर, महेश टॉकीज, चेंढरे मारूती मंदिर, रायवाडी मार्गे श्रीबाग आंबामाता मंदिर, गणपती मंदिर, शेतकरी भवनमार्गे महावीर चौक, घरत आळी त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी काढण्यात आली.

या रॅलीमध्ये अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पिंट्या ठाकूर, काँग्रेसचे पदाधिकारी, शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा वृषाली ठोसर, अ‍ॅड. गौतम पाटील, संजना कीर, अश्‍विनी पाटील, प्रिया वेलकर, अनिल चोपडा आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला तरुण मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘महाविकास आघाडीचा विजय असो, लाल बावटे की जय, लढेंगे जितेंगे’ अशा घोषणा देत ही बाईक रॅली संपूर्ण शहरात काढण्यात आली. संपूर्ण शहरामध्ये शिट्टीचाच आवाज घुमला होता.

प्रचार रॅलीदरम्यान चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.अनेकांनी त्यांचे औक्षण करीत शुभेच्छा दिल्या. नाक्या-नाक्यावर फटाक्यांची आतषबाजी करीत हा प्रचाराचा जल्लोष साजरा केला. अनेक तरुण महिला, कार्यकर्ते या रॅलीमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. एक वेगळा उत्साह घेऊन या रॅलीमध्ये कार्यकर्ते सामील झाल्याचे चित्र दिसून आले.

तरुणांचा वाढता उत्साह
महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचाराचा झंझावात अलिबाग शहरामध्ये रविवारी सायंकाळी पहावयास मिळाला. ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबरच महिला, तरुण, तरुणी या बाईक रॅलीत सामील झाल्या होत्या. या रॅलीमध्ये तरुणांचा उत्साह प्रचारात दिसून आला.
Exit mobile version