छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

अभियानाचा लाभार्थ्यांना आधार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

महसूल मंडळ अलिबाग आणि अलिबाग नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन शुक्रवारी (दि. 8) अलिबाग करण्यात आले. जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलमधील सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. या शिबीराच्या माध्यमातून विविध विभागाच्या योजनांचा लाभ एका छताखाली देण्यात आला. या अभियानाचा 125हून अधिक लाभार्थ्यांना आधार मिळाला.

रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, नगरसेवक अनिल चोपडा, अश्वीनी ठोसर, ॲड. निवेदिता वाघमारे, शैला भगत, सुषमा पाटील, समीर ठाकूर, संदीप पालकर, जमाल सय्यद, ॲड. अंकित बंगेरा, मुख्याधिकारी सागर साळुंखे, निवासी नायब तहसीलदार संदिप जाधव, निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार अजित टोलकर,अलिबागचे मंडळ अधिकारी रुपेश रेवसकर, रविकांत जाधव, ग्राम महसूल अधिकारी गणेश लोहार, बामणोलीच्या ग्राम महसूल अधिकारी स्वाती गायकवाड, खंडाळेच्या ग्राम महसूल अधिकारी हेलमता बोबडी, महसूल सेवक, अलिबाग नगरपरिषद आणि महसूल विभागाचे कर्मचारी, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ एका छताखाली देण्यात आला. उत्पन्न दाखल्यासह जातीचा दाखला, प्रॉपर्टी कार्ड, रेशनकार्ड, गावठाण नकाशा, सातबारा अशा अनेक प्रकारचे दाखले लाभार्थ्यांना देण्यात आले. दरम्यान दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून अलिबाग महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामपंचायती व नगरपरिषद हद्दीतील लाभार्थ्यांना अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या महसूल विभागामार्फत प्रलंबित असलेले दाखले तसेच नागरिकांना आवश्यक असणारी विविध प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कागदपत्रे थेट शिबिरातच मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमांमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार फेरे मारण्याची गरज कमी होत असून प्रशासन त्यांच्या दारी पोहोचत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Exit mobile version