। पॅरिस । वृत्तसंस्था ।
भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहा पदकांवर मोहोर उमटवली. काही खेळांमध्ये थोडक्यात पदके हुकली. याच पार्श्वभूमीवर ऑलिंपिकमधील भारतीय पथकाचे प्रमुख गगन नारंग यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, भारतामध्ये क्रीडा संस्कृती रुजायला हवी. तसेच, यापुढे ऑलिंपिकमध्ये अधिकाधिक खेळाडू पात्र ठरायला हवेत.
गगन नारंग यांनी पॅरिस ऑलिंपिकमधील कामगिरीचा लेखाजोखा मांडताना सांगितले की, सर्वप्रथम पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करतो. मात्र, मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, आणखी पदके मिळायला हवी होती. काही खेळाडूंना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. काही खेळाडू अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. ही प्रोत्साहन मिळणारी बाब आहे. आता या कामगिरीत सुधारणा करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवायला हवे. त्यानंतरच लॉस एंजिलिस ऑलिंपिकमध्ये पॅरिसपेक्षा जास्त पदके जिंकता येतील.
गगन नारंग यांनी पुढे सांगितले की, पॅरिस ऑलिंपिकमधून खूप काही शिकायला मिळाले. यापुढील ऑलिंपिकमध्ये याचा फायदा होईल. छोट्या फरकामुळे आपण पदकांना मुकलो आहोत. पॅरिस ऑलिंपिकमधील कामगिरीचा अहवाल मी भारतीय ऑलिंपिक संघटना व केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांच्याकडे सुपूर्द करणार आहे.