उरण तालुक्यातील क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कार्यक्रम उरण पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी उरण तालुक्यातील घारापुरी, गोवठणे, भेंडखळ, सारडे, वशेणी, पुनाडे या सहा ग्रामपंचायतींना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. बाळासाहेब काळेल, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सहायक गट विकास अधिकारी संतोषसिंग डाबेराव या सर्वांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधींची प्रतिकृती, सन्मानपत्र व तुळशीचे रोपटे देऊन, गौरविण्यात आले. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आरोग्य अधिकारी संतोष परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तर कार्यक्रमाप्रसंगी सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर उपस्थित होत्या. यावेळी सर्वांना सन्मानित करण्यात आले.