वीजबिल न भरल्याने क्रीडा विभाग अंधारात

| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुल विभागाला 45 हजार रुपयांचे विद्युत बिल आले. हे बिल वेळेवर भरण्यास क्रीडा विभाग उदासीन ठरल्याने विद्युत सेवा खंडीत करण्यात आली. त्याचा फटका उन्हाळ्यात जलतरण तलावात पोहण्यास येणार्‍या नागरिकांना बसला आहे.

या क्रीडा संकुलात अंतर्गत आणि बाह्य खेळ खेळले जातात.येथे एक जलतरण तलावही आहे. मात्र तो गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या नावे 45 हजार रुपयांचे विद्युत बिल आलेले आहे. बिल आले.ते वेळेवर भरण्यास क्रीडाविभाग अपयशी ठरले. त्याचा परिणाम गेल्या अनेक दिवसांपासून जलतरण तलावदेखील बंद ठेवण्यात आला आहे. उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे दर दिवसाला 15 हून अधिक नागरिक पोहण्यासाठी येतात. परंतु वीज पुरवठा खंडीत झाल्याने पोहण्यास येणार्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसला आहे. जिल्हा क्रीडा विभागाला कोट्यवधी रुपयांचा निधी येतो. परंतु वेळेवर वीज बिल भरण्यास असमर्थ ठरल्याने या प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्याने जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक यांची बिल भरण्यास धावपळ सुरु झाली.बिल भरण्यासाठी जिल्हा क्रीडा विभागाने धनादेश काढला आहे. मात्र त्या धनादेशावर सहीचा अडथळा निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीला वीज बिल भरण्यासाठी देण्यात येणार्‍या धनादेशावर जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडाधिकारी यांची सही होते.जिल्हाधिकारी सध्या आजारी असल्याने आणखी काही दिवस वीज बील भरण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडाधिकारी नाईक यांनी महावितरण विभागाच्या अधिकारी यांना तुर्तास वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. आठ दिवसात वीज बिल भरले जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचे अधिकारी आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी पूर्वसुचना देणे अपेक्षित आहे. मात्र तशी कोणतीही सुचना आम्हाला देण्यात आलेली नाही. वीजबिल भरण्यासाठी धनादेश तयार आहे. लवकरच ते भरले जाणार आहे. तुर्तास पुरवठा सुरु करण्याची मागणी केली आहे. – रविंद्र नाईक – जिल्हा क्रीडाधिकारी

Exit mobile version