अवकाळीमुळे भातपिकास फुटले कोंब

शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू
। मुरूड-जंजिर । वार्ताहर ।
अवकाळी पावसाचा मोठा फटका मुरूड तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला असून रचलेल्या भात मळणी झोडण्यास सुरुवात केल्यानंतर भात पिकास लोंब्याना चक्क कोंब फुटल्याचे मुरूड तालुक्यातील वाणदे या गावी दिसून आले. वाणदे येथील दत्ता सातामकर यांच्या शेतात भात झोडणी सुरु असून झोडणी करताना भाताच्या लोंब्यांना कोंब फुटल्याचे दिसून आले. यामुळे खूप नुकसान झाले आहे. बाजूच्या गोपाळ वारगे, यांनाही असाच फटका बसला आहे. गोपाळ वारगे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे भात पीक नेस्तनाबूत झाले असून रचून ठेवलेल्या भात मळण्या भिजून कोंब फुटले आहेत. भात पूर्णपणे झोडणी करतानाच मोठे नुकसान झाल्याचे सांगताना शेतकरी गोपाळ वारगे यांचे डोळ्यात अश्रू उभे राहिले.अवकाळी पावसाने आमचे अतोनात नुकसान झाले असून प्रपंचाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. केवळ भात पिकच नव्हे तर हिरवा मूग, चवळी, काळा मूग, वाल आदी पीकही नेस्तनाबूत झाले आहे. अवकाळीमुळे जमिनीत पाणी असून आधी पेरणी केलेले वाल पीक नष्ट झाले आहे. पुन्हा पेरणी केली तरी वाल पीक पूर्णपणे तयार होण्यास एप्रिल महिना लागू शकतो.


अवकाळी पावसाचे पाणी अजूनही पूर्णपणे मुरलेले नसून या पूर्वी पेरलेले वालाचे बी कुजले आहे. भात पिकाला कोंब फुटले आहेत. पुन्हा बी पेरणी करणे परवडणारे नाही. शेतात राबवायचे आणि पावसाने अचानक येऊन केलेली पिकाची नासाडी पहायची याचेच खूप दुःख होते. केवळ पावसावर अवलंबून शेती करणे पारंपरिक शेतकर्‍यांना जिकरीचे बनले आहे. आमच्या भागात आंबोली सिंचन धरण असूनही कालवे काढले नसल्याने येथील शेतकर्‍यांना काहीच उपयोग होत नाही अशी माहिती गोपाळ वारगे, यांनी दिली.

Exit mobile version