| कोर्लई | वार्ताहर |
मुरुडमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) शहर शाखेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुरुड बाजारपेठेत गेली पंधरा वर्षे खास महिलांसाठी मानाची दहीहंडी बांधण्यात येते. यंदाही श्रीकाळभैरव गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला आहे. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती मानाचे चषक गोविंदा पथकाला देण्यात आले.
श्री कालभैरव भंडारी महिला गोविंदा पथकांची स्थापना पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आली होती. पूर्वी भंडारवाडा मर्यादित हा गोविंदा पथक होता. आता मात्र मुरुड मधील सर्व समाजाच्या महिला यात सहभागी होत असतात. या महिलांचा उत्साह पाहून गेले पंधरा वर्षापासून शिवसेनेच्यावतीने मुरुड बाजारपेठेतील दहीहंडीचे आयोजन तालुका संघटक कुणाल सतविडकर हे करत आले आहेत. गेली नऊ वर्ष महिला गोविंदा पथक ही दहीहंडी फोडून ट्रॉफी मिळवित आहेत. गोविंदा महिला पथकासाठी प्रशिक्षक समीर सुर्वे हे मेहनत घेत आहेत. या गोविंदा पथकासाठी भंडारी समाजाचे मोठे सहकार्य लाभले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.