आता भारताची खरी कसोटी; श्रीलंका दौऱ्यासाठी लवकरच संघाची घोषणा

कसोटी अजिंक्यपदासाठी महत्त्वाची मालिका

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय पुरुष क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार असून, त्यासाठी लवकरच संघाची घोषणा केली जाणार आहे. भारताने नुकतेच इंग्लंड दौरा केला होता. त्यामध्ये अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती. त्यामुळे निवड समितीला त्याच्याबाबतीत स्पष्टतेची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता तो आवश्यक परवानगीसाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेंसमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात तयारी सुरू करण्यासाठी 4 ऑगस्ट रोजीच रवाना होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे यादरम्यान सुंदरबाबत काय निर्णय घेतील, हे कळेलच. या कसोटी मालिकेची सुरूवात 15 ऑगस्टपासून गॉल कसोटीने होणार आहे. तत्पूर्वी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. भारताने शेवटचा कसोटी सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यामध्ये जो संघ खेळवला होता, त्यात बदल होण्याची शक्यता आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी संघात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा परतण्याची शक्यता आहे. जडेजा मागील बराच कालावधीपासून संघाबाहेर आहे. त्याला अफगाणिस्तानविरुद्ध संधी न दिल्याने बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. त्यावर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी, “तो या फॉरमॅटमधील क्रमांक 1 चा गोलंदाज आहे”, असे म्हटले होते. यावरून त्याची निवड आगामी कसोटी मालिकेसाठी होण्याची शक्यता आहे. तसेच, सुंदर संघात सामील झाला नाही, तर हर्ष दुबेला कायम ठेवले जाईल की निवड समिती दुसऱ्या ऑफ स्पिनरला संधी देते, हे लवकरच कळेल. त्याचबरोबर मानव सुतार आणि कुलदीप यादव यांची जागा कायम राहिल, तर वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णा याची निवड होण्याची अपेक्षा आहे.

फलंदाजांचा विचार केला, तर नेहमीचीच नावे कायम राहतील. मागील कसोटी सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये गिलसोबत केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, यशस्वी जायस्वाल आणि ध्रुव जुरेल या फलंदाजांचा समावेश होता. संघनिवडीच्या बैठकीत अष्टपैलूंमध्ये सुंदरबरोबर नितीश कुमार रेड्डीबद्दलही निर्णय घेतला जाणार आहे. श्रीलंकेतील ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 चा भाग आहे. त्यामुळे संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मागील मालिकांमध्ये भारताला संघर्ष करावा लागला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध व्हाईटवॉश मिळाला आहे.

Exit mobile version