सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरलं; स्मृतीची दमदार अर्धशतकी खेळी
| मुंबई | प्रतिनिधी |
एशियन गेम्स 2026 मधील महिला भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 147 धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे. एशियन गेम्समधील महिला भारतीय संघाचे हे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. टॉस जिंकत भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या.
भारताकडून सलामावीर स्मृती मानधना हिने सर्वाधिक 79 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली होती. त्यासोबतच शेफाली वर्मा 48 धावा आणि रिचा घोषने नाबाद 49 धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 69 धावांवर ऑल आऊट झाला. भारताच्या गोलंदाजांसमोर लंकेच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. फायनल सामन्यात भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट तर शेफाली, श्रेयांका आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट नावावर केल्या होत्या. श्रीलंका संघाच्या सात खेळाडूंना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. तर यामधील तीन खेळाडू शून्यावर आऊट झाले. एशियन गेम 2026 मधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
भारताच्या डावाची सुरुवातच आक्रमक झाली होती. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या सलामीच्या जोडीने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला. दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 99 धावांची भागीदारी करत संघाला भक्कम पाया मिळवून दिला. पॉवरप्लेच्या सहा ओव्हरमध्ये भारताने एकही विकेट न गमावता 67 धावा केल्या होत्या. मानधनाने आपल्या फटकेबाजीने सुरुवातीपासूनच इरादे दाखवले होते. तिसऱ्या ओव्हरमध्ये तिने सलग दोन षटकार खेचत श्रीलंकेच्या गोलंदाजांना सावध केले. दुसऱ्या बाजूला शेफालीनेही वेगवान धावा करत तिची उत्तम साथ दिली. शेफाली 48 धावांवर आऊट झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र ती 17 चेंडूंमध्ये 19 धावा करून माघारी परतली. मानधनाने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवत 45 चेंडूंत 79 धावांची शानदार खेळी साकारली. तिच्या या खेळीत 5 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. दरम्यान, या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंका संघाला सुरूवातीपासूनच धक्के बसले. कर्णधार चमारी अथापथुने सर्वाधिक 29 धांवाची खेळी केली होती. यामध्ये तिने 5 चौकार मारलेले मात्र दीप्ती शर्मा हिने तिला आऊट केले. बाकी फक्त कौशानी नुथ्यांगनाने 14 धावा तर कविशा दिलहरीने 11 धावा केल्या होत्या. इतर कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा ऐतिहासिक टप्पाही गाठला. रिचा घोषने संघाला 200चा टप्पा पार करून दिला. अवघ्या 22 चेंडूत तिने 49 धावांची आक्रमक खेळी केली होती. 6 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी केली होती.







