सलग पराभवाने बांगलादेशचे आव्हान संपुष्टात
| कोलंबो | वृत्तसंस्था |
नुकताच बांगलादेश आणि श्रीलंका या संघामध्ये आशिया चषकातील सुपर-4 फेरीतील सामना खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात एकावेळी बांगलादेश आणि श्रीलंकेत बरोबरीत सामना सुरु होता. मात्र, श्रीलंकन गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी नांगी टाकली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करत 9 गडी गमावत 257 धावा केल्या. श्रीलंकेच्या या डावात सदिरा समरविक्रमा याने सर्वाधिक 93 धावा केल्या. कुसल मेंडिस याने देखील अर्धशतकी खेळी करत संघाचा धावफलक पुढे नेला. बांगलादेश संघासाठी तस्किम अहमद आणि हसन मेहमुद यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
257 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीरांनी अर्धशतकीय सुरुवात करुन दिली. मात्र, वैयक्तिक 21 धावांवर खेळणाऱ्या मेहेदी हसनला बाद करुन दसून शनाका याने बांगलादेश संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर संघाला गळती लागली आणि ठराविक अंतराने फलंदाज बाद होऊ लागले. बांगलादेश संघासाठी तोहिद ह्रिदोय याने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. बांगलादेशच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र, बांगलादेशला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशच्या संघ 236 धावांवर सर्वबाद झाला.