श्रीलंकेचा विश्वचषकामध्ये पहिला विजय

नेदरलँडला 6 विकेटने हरवले, निसांका-समरविक्रमाची अर्धशतके


| लखनौ |वृत्तसंस्था |

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने पहिला विजय मिळवला. या संघाने रोमहर्षक सामन्यात नेदरलँड्सचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्या तीन सामन्यांत संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. लखनौच्या एकना स्टेडियमवर नाणेफेक जिंकून नेदरलँड्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. संघ 49.4 षटकांत 262 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 48.2 षटकांत 5 गडी गमावून 263 धावा करत लक्ष्य गाठले. पाथुम निसांकाने 54 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. त्याचवेळी सादिरा समरविक्रमाने 91 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

श्रीलंकेचे 104 धावांवर 3 फलंदाज बाद झाले होते . येथून चरित असलंका आणि सदिरा समरविक्रमाने संघाची धुरा सांभाळली. या दोघांनी 99 चेंडूत 77 धावांची भागीदारी करत श्रीलंकेची धावसंख्या 180 च्या पुढे नेली. दरम्यान, सदिरा समरविक्रमाने आपले अर्धशतक पूर्ण केले. असलंका 44 धावा करून बाद झाला आणि दोघांमधील भागीदारी तुटली. श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका 54 धावा करून बाद झाला. त्याने सदीरा समरविक्रमासोबत तिसऱ्या गड्यासाठी 40 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. निसांका सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावून बाद झाला. नेदरलँड्सपूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धही अर्धशतके झळकावली होती.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सचा डाव 49.4 षटकांत सर्वबाद 262 धावांवर आटोपला. नेदरलँडसाठी सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांनी अर्धशतकी खेळी खेळली. दोघांच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक आहे. तर श्रीलंकेकडून कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका यांनी 4-4 गडी बाद केले . महीश तीक्षणाला एक गडी बाद करता आला. नेदरलँड आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषकाच्या इतिहासातील हा पहिला सामना आहे. याआधी विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आलेले नाहीत. पहिल्या पॉवरप्लेमध्ये नेदरलँडची सुरुवात खराब झाली. पहिल्या 10 षटकांमध्ये 48 धावांवर संघाने दोन गडी गमावले. विक्रमजीत सिंग 4 धावा करून बाद झाला तर मॅक्स ओडॉड 16 धावा करून बाद झाला.

Exit mobile version