पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेतील सुरुवात विजयाने केली. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 165 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना श्रीलंकेला चांगलाच घाम गाळावा लागला. पण, चरिथ असलंका (62*) आणि सदीरा समराविक्रमा (54) यांच्या 78 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीने बांगलादेशच्या हातून सामना खेचून नेला.
चरिथ व सदीरा यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. त्याआधी महिश थिक्षना (2-19) आणि मथिशा पथिराणा (4-32) यांनी उत्तम गोलंदाजी करून बांगलादेशला बॅकफूटवर फेकले होते. श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर 15 धावांवर माघारी परतले. तस्कीन अहमद व शॉरिफुल इस्लाम यांनी अनुक्रमे पथुम निसंका (14) व दिमुथ खरुणारत्ने (1) यांना माघारी पाठवले. त्यानंतर शाकिब अल हसनच्या अप्रतिम चेंडूवर कुसल मेंडिसचा (5) त्रिफळा उडाला अन् श्रीलंकेला 43 धावांवर तिसरा धक्का बसला. शाकिब, मेहिदी हसन मिराज व महेदी हसन यांच्या माऱ्याने श्रीलंकेच्या फलंदाजांचं टेंशन वाढवलेलं होतं. चरिथ असलंका आणि सदीरा समराविक्रमा यांच्या संयमाची कसोटी होती आणि ते त्यावर खरे उतरले. दोघांनी संयमी खेळ करून बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगले उत्तर दिले. सेट झाल्यानंतर दोघांनी हात मोकळे करून अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.