ऑलिंपिकसाठी बोपण्णाकडून श्रीराम बालाजीला प्राधान्य

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेस पात्र ठरलेल्या रोहन बोपण्णाने दुहेरीतील आपला साथीदार म्हणून एन. श्रीराम बालाजी याची निवड केली आहे. सध्या सुरू असलेल्या फ्रेंच ओपनमध्ये लक्षवेधक कामगिरी केल्यामुळे बोपण्णाने बालाजीला प्राधान्य दिले आहे. श्रीराम बालाजी आपला साथीदार असेल, असे बोपण्णाने अखिल भारतीय टेनिस संघटनेला कळवले आहे. त्याची ही मागणी संघटना मान्य करेल, अशी अपेक्षा आहे. फ्रेंच स्पर्धेत बालाजी मॅक्सिकोच्या एमए रेयास-वारेला मार्टिनेझ याच्यासह फ्रेंच ओपनमध्ये खेळत आहे. त्यांचा तिसर्‍या फेरीत रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन यांच्यासमोर पराभव झाला असला, तरी त्यांनी फारच झुंझार खेळ केला. बालाजीची सर्व्हिस वेगवान आहेच तसेच तो बेसलाईनवरूनही चांगला खेळ करतो. असा खेळ क्ले कोर्टवर फायदेशीर ठरतो. फ्रेंच ओपनमधील या कोर्टवरच पॅरिस ऑलिंपिकमधील टेनिसचे सामने होणार आहेत. म्हणूनच बोपण्णाने बालाजीला प्राधान्य दिले. ऑलिंपिक स्पर्धा पुढील महिन्यात होत आहे.

Exit mobile version