झुंझार पोयनाड प्रीमियर लिग

श्रीस्वामी समर्थ ओमसाई फार्म हाऊस संघ विजयी

| रायगड | प्रतिनिधी |

झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या 61व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या झुंझार पोयनाड प्रीमियर लिग, कै. देवेंद्र पाटील स्मृतीचषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विशाल निषाद यांनी अष्टपैलू खेळ करून श्रीस्वामी समर्थ ओमसाई फार्म हाऊस पोयनाड संघाला स्पर्धेत अंतिम विजय मिळवून दिला आहे.

दि.29 व 30 एप्रिल रोजी झुंझारच्या सुसज्ज मैदानावर स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होतं. पोयनाड गावातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मराठा वॉरियर्स, पोयनाड सुपर जायंट्स, दि बॉईज, नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्रीस्वामी समर्थ ओमसाई फार्म हाऊस अशा पाच संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू खेळ करणारा विशाल निषाद हा अंतिम सामन्यातील सामनावीर व मालिकवीर ठरला. मिलिंद पाटील उत्कृष्ट फलंदाज, प्रणय साळवी उत्कृष्ट गोलंदाज, तर प्रीत जैन याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गौरविण्यात आले.

स्पर्धेत श्रीस्वामी समर्थ ओमसाई फार्महाऊस संघमालक राजेंद्र जाधव, भूषण चवरकर, शैलेंद्र गायकवाड, अमोल खैरनार, बंटी टेमकर यांच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर मराठा वॉरियर्स संघमालक विकी कामठे, निखिल तावडे यांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचं उद्घाटन व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी पोयनाड ग्राम पंचायतीचे सदस्य तथा मंडळाचे सदस्य माजी खेळाडू सुनील पाटील, मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, किशोर तावडे, अजय टेमकर, माजी सरपंच भूषण चवरकर, सदस्य अजित चवरकर, डॉ. मोनाली चवरकर, संजय सातघरे, जितेंद्र जैन, भरत जैन, महेश अग्रवाल, विजय चवरकर, उदय चवरकर, योगेश चवरकर, मनोज भगत यांच्यासह पोयनाड गावातील व्यापारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version