श्रीवर्धन समुद्र किनारा विद्रुप

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

सध्या श्रीवर्धन समुद्रकिनारा हे पर्यटकांसाठी कोकणातील क्रमांक एकचे पर्यटन ठिकाण झालेले आहे. कारण या समुद्रकिनार्‍यावर सुसज्ज व सुशोभीकरण केलेला धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधार्‍यांवर पर्यटकांना बसण्यासाठी बाकडी, त्याचप्रमाणे मचाण तयार करण्यात आलेले आहेत. तसेच, विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट, विद्युत रोषणाई, त्याचप्रमाणे कोळंबी, खेकडा यासारख्या समुद्र प्राण्यांच्या जातीच्या प्रतिकृती समुद्रकिनार्‍यावर लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

तसेच, पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे समुद्र किनार्‍यावरत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणार्‍यांची गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. या स्टॉल धारकांमध्ये जे जुने स्टॉल धारक आहेत ते श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीच्या बाहेरील आहेत व आत्ता नव्यानेच ज्यांनी जागा अडवून स्टॉल उभारलेले आहेत असे श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीमधील स्टॉल धारक आहेत. परंतु, आपले स्टॉल उभे करताना जागा अडवण्यासाठी या स्टॉल धारकांकडून जुन्या फाटलेल्या साड्या किंवा जुने कपडे लाऊन जागा अडवलेली आहे. त्यामुळे श्रीवर्धन समुद्रकिनारा अतिशय विद्रूप झाल्याप्रमाणे दिसत आहे. श्रीवर्धन समुद्रकिनारी असलेली जागा ही वनविभागाच्या अखत्यारित असल्याने त्या ठिकाणचे अतिक्रमण वनविभागाने हटवायचे की नगरपरिषदेने, यामध्ये नेहमीच वाद निर्माण होत असतो. वनविभागाकडे सक्षम यंत्रणा त्याचप्रमाणे मनुष्यबळ व अधिकार असताना देखील वनविभागाकडून या ठिकाणी कारवाई करण्यात येत नाही.

Exit mobile version