12 गावे नॉट रिचेबल, सतत यंत्रणेत बिघाड; दुर्गम भाग असल्याने दुर्लक्ष
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी परिसरातील 12 गावांचा मोबाईलवरून होणारा संपर्क तुटला आहे. गेली दोन वर्ष वारंवार होणाऱ्या नेटवर्कबाबतच्या अडचणीमुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील कासारकोंड, धनगरमलई, नागलोली मधलीवाडी, नागलोली, नागलोली नवीवाडी, देवखोल, बोर्ला, बोर्ला रसाळवाडी, वावेपंचतन, वाकलघर, दांडगुरी, वांजळे अशा एकूण 12 गावांना बीएसएनएल कंपनीच्या टॉवरमुळे नेटवर्क सुविधा मिळते. पण सुरुवातीपासूनच या यंत्रणेत सातत्याने बिघाड असल्याने हा दुर्गम भाग म्हणून कायम दुर्लक्ष झाले आहे. परिणाम काय तर येथील मोबाईल सेवा ही त्रासदायक बनली आहे.
बीएसएनएलची दूरध्वनी सेवा कायमचीच खंडित होत असते. या सरकारी कंपनीच्या सेवेवर अवलंबून असलेला ग्रामीण भाग आता त्रस्त झाला आहे. या गावांची 14000 हुन अधिक लोकसंख्या असून अनेकजण कामानिमित्त मुंबईस्थित असल्याने कित्येक वेळा या आडमार्गावर कोणतीच सुविधा मिळत नाही. त्यामध्ये नेटवर्कची असुविधा असल्याने रात्रीबेरात्री प्रवास जोखमीचा ठरत आहे.
गावात पहिली ते दहावीपर्यंत शाळा असून, शाळांची ऑनलाइन कामे करण्यासाठी अत्यंत अडचणी येतात. वर्गात कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन साहित्य वापरता येत नाही. सर्व प्रकारची डिजिटल साधने उपलब्ध असताना नेटवर्कअभावी त्यांचा वापर करता येत नाही.शेतकऱ्यांना शासकीय आदेशाने शेतीची पीकपाहणी ऑनलाइन पद्धतीने करावी लागत असल्याने, ती पीकपाहणी कोणत्याही शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे विविध अनुदाने, योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ही गावे जंगल भागात असल्याने अचानक प्रसंग बेतला तर कोणत्याही मदतीसाठी आजूबाजूंच्या गावांकडे संपर्क साधावा लागल्यास कोणताच पर्याय उरत नाही. त्यामुळे अशा कंपनीच्या सेवांना स्थानिक नागरिक वैतागले आहेत.
देवाखोल टॉवरमध्ये टूजी सिस्टीमचे जुनी टेक्नॉलॉजी असल्याने मशनरी पार्टचे बिघाड होते. त्याचे दुरुस्तीसाठी हार्डवेअर मिळत नाही. आता या गावांना नेटवर्क सुविधा मिळण्यासाठी धनगरमलई व वांजळे याठिकाणी नवीन टॉवरचे काम लवकरच सुरू होईल .
दत्तात्रय दिघे, बीएसएनएल अधिकारी
गेली दोन वर्ष नेटवर्क सुविधा सुरळीत मिळत नाही. नेटवर्क विना कित्येक वेळा प्रसंगी तत्काळ परिवाराशी संपर्क होत नाही. माध्यमातून नेहमीच समस्या मांडण्यात येते, आता तरी लक्ष घालावे.
जयेश जाधव, नागलोली रहिवाशी.