| अलिबाग | प्रमोद जाधव |
श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 1992- 93 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या आरडीएक्स तालुक्यातील शेखाडी सुपारी या किनाऱ्यावर उतरविले होते. त्याच धर्तीवर आता श्रीवर्धन तालुक्यातील कोंडीवली, दिवेआगर, मारळ या समुद्रकिनारी अफगानच्या चरस या अंमली पदार्थाची पाकीटे मोठ्या प्रमाणात सापडू लागल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसांची यंत्रणा सतर्क झाली आहे. श्रीवर्धनचा समुद्रकिनारा तस्करांच्या विळख्यात सापडला की काय अशी चर्चा आता रंगू लागला आहे.
रत्नागिरीमधील समुद्रकिनारी चरस सापडल्यानंतर रायगड पोलीसांनी जिल्ह्यातील समुद्रकिनारी गस्त वाढविली होती. 17 सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 85 पोलीसांचा ताफा तैनात केला होता. अखेर 27 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान जीवना समुद्रकिनारी 41 लाख 54 हजार रुपये किंमतीची अंमली पदार्थाची नऊ पाकीटे सापडली होती. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी एक कोटी सात लाख रुपये किंमतीची 24 पाकीटे सापडली होती. पुन्हा श्रीवर्धन तालुक्यातील कोंडीवली, दिवेआगर समुद्रकिनारी 44 पाकीटे सापडल्याने पुन्हा एकदा श्रीवर्धनमधील समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 27 ते 29 ऑगस्ट या कालावधीत अंमली पदार्थाची 107 पाकीटे सापडली आहेत.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी पुन्हा अंमली पदार्थांचा साठा सापडला आहे. या पाकीटांवर अफगाण देशाचे नाव असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मागील दोन दिवसांपुर्वीदेखील समुद्रकिनारी अंमली पदार्थाचा साठा सापडल्याने सागरी सुरक्षेचा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.