श्रीवर्धनच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना अनेक थांबे

शहराचा प्रवास झाला कंटाळवाणा

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन आगाराकडून मार्गस्थ होणाऱ्या मुंबई, बोरीवली, नालासोपारा, भाईंदर या लांब पल्ल्याच्या गाड्यांना श्रीवर्धन ते माणगाव या मार्गावर अनेक थांबे आहेत. नागोठणे ते पनवेल या मार्गावरही अनेक थांबे दिल्याने प्रवासीवर्गाचा प्रवास अत्यंत कंटाळवाणा होत आहे. प्रवासीवर्ग आता खासगी बसेसचा प्रवास सुखकर होत असल्याने आता श्रीवर्धन आगाराच्या एसटीकडे पाठ फिरवू लागलेत.

बसस्थानकातून शहरांकडे जाण्यासाठी बागमांडला, बोर्लीपंचतन, दिघीमार्गे तसेच तालुक्यातील अनेक खेडेगावातून प्रवासी घेत गाड्या मार्गस्थ होतात. म्हसळा ते माणगाव या मार्गावरील प्रवाशांना शहराकडे जाण्यासाठी एसटी हाच पर्याय असल्यामुळे प्रवाशांसाठी अनेक थांबे घेत श्रीवर्धन आगाराच्या गाड्या माणगावपर्यंत जातात. प्रवासीवर्गाचा माणगाव ते नागोठणे हा प्रवास कोलाड वगळता विनाथांबा असल्याने सुखकर होतो. परंतु नागोठणे ते पनवेल या मार्गावरील कोलेटी, आमटेम, कासू, गडब वडखळ, रामवाडी, पेण, जिते, खारपाडा पुल, खारपाडा गाव, तारा या थांब्यावर गाड्या थांबत जात असल्याने श्रीवर्धनपासून शहरापर्यंतचा प्रवास करणारा प्रवासी वैतागून जातो.

शहराकडे जाणाऱ्या- येणाऱ्या गाड्यांना नागोठणे ते तारा दरम्यान इतके थांबे कशासाठी, अनावश्यक थांबे कोणाच्या आशीर्वादाने दिले गेलेत की या मार्गावरील एसटी.कर्मचाऱ्याच्या सोयीसुविधेसाठी श्रीवर्धन आगाराच्या गाड्यांचा उपयोग होतोय असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.


नागोठणे ते खारपाडा या दरम्यान श्रीवर्धन आगारातील मुंबईकडील गाड्यांना अनेक ठिकाणी थांबे आहेत, यामुळे श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवाशांना विनाकारण वेळ व मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत अनेक वेळा श्रीवर्धन आगार व्यवस्थापक व वाहतूक विभाग नियंत्रक, रामवाडी यांना विनंती करून देखील अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.

ॲड.जयदीप तांबुटकर
Exit mobile version