श्रीवर्धनचे पर्यटन बहरले

मे महिनाअखेरीस पर्यटक दाखल

| श्रीवर्धन | वार्ताहर |

हवामान खात्याकडून वर्तवली जाणारी उष्णतेची लाट व त्यापाठोपाठ चक्रीवादळाचे दिले जाणारे इशारे या कारणास्तव विद्यालयीन, महाविद्यालयीन परीक्षा आटोपूनसुद्धा पर्यटक श्रीवर्धनकडे फिरकले नव्हते. परंतु, शनिवार, रविवार सलग सुट्ट्यांमुळे मे महिनाअखेरीस पर्यटक श्रीवर्धन येथे दाखल झाले आहेत.

पर्यटन व्यवसायीकांचा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत हा एप्रिल, मे व जून महिन्याचे पहिले दोन आठवडे. एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊनदेखील पर्यटक श्रीवर्धन येथे न फिरकल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. पर्यटनासाठी उत्तम ठिकाण समजल्या जाणार्‍या श्रीवर्धन येथे वाढती उष्णता त्यातच हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचे दिलेले अंदाज यामुळे काही पर्यटकांनी केलेले अ‍ॅडव्हान्स बुकींगही रद्द केले होते. उष्णतेच्या लाटेपाठोपाठ मुंबई येथे झालेले चक्रीवादळ व हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला चक्रीवादळाचा इशारा या कारणाने पर्यटक श्रीवर्धनकडे फिरकले नाहीत.

मे महिन्यातील चौथ्या आठवड्यात गुरुवारी आलेली बुध्दपौर्णिमेची सुट्टी व चौथा शनिवार व रविवार या सुट्ट्यांमुळे पर्यटक श्रीवर्धनमध्ये दाखल झाले. काहीशा निराशाजनक गेलेल्या पर्यटन व्यवसायाला मे महिनाअखेरीस काही प्रमाणात उभारी आली. दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर श्रीवर्धन पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालेले बघावयास मिळाले. श्रीवर्धन येथे दोन दिवस राहण्यास सहज खोली उपलब्ध होईल या भ्रमात आलेल्या अनाहूत पर्यटकांना निराशा पदरी घेऊन माघारी फिरावे लागले.

मे महिना अखेर चांगली जात आहे. एक जूनपर्यंत बुकिंग झालेले आहे. आलेले पर्यटक जेवणात मच्छीची मागणी करतात आणि कोकणातील मोदकांची लज्जत घेतात.त्यातही विशेष म्हणजे पर्यटक चुलीवर वालाची उसळ, झुणका भाकर तसेच कोकणातील पदार्थ बनवण्यास सांगतात.

महेंद्र भोसले, गुलमोहर फॅमिली रिसॉर्ट, श्रीवर्धन
वाहतूक कोंडीवर उपाय
श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यालगतचे रस्ते एकेरी व अरुंद आहेत. आलेला पर्यटक रस्त्याच्या कडेला आपले वाहन उभे करीत समुद्रकिनार्‍यावर निघून जातात. परिणामी, अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी समस्या निर्माण होते. सदरच्या समस्येची दखल घेत श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडून र.ना. राऊत शाळा मैदान रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट्स उभी करीत पोलीस पर्यटकांच्या वाहनांना मैदानात जागा उपलब्ध करून देत होते. या कारणाने काही अंशी वाहतूक कोंडी समस्या कमी झाल्याचे निदर्शनास येत होते.
Exit mobile version