| माणगाव | प्रतिनिधी |
एसटीमधून प्रवास करीत असताना तिकिटाचे 10 रुपये मागितल्याच्या कारणावरून वाहकाला प्रवाशाने धक्काबुक्की केल्याने आरोपी प्रवासीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी घडली.या घटनेची फिर्याद एसटी बसचा वाहक अविनाश साधू पवार यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
अविनाश पवार हे श्रीवर्धन डेपोमध्ये वाहक म्हणून काम करतात.मंगळवारी दुपारी श्रीवर्धन ते माणगाव या मार्गावर एसटी घेऊन जात असताना प्रवासी अहमद अब्दुल रेहमान जालगावकर (वय-50) रा.निजामपूर ता.माणगाव यांच्याकडे तिकिटाचे 10 रुपये मागिलते असता त्यांनी पैसे देण्यास नकार देऊन पैसे नंतर देतो असे सांगितले.परंतु प्रवासाचा शेवटचा टप्पा असल्याने त्यांना लगेच पैसे देण्यासाठी वाहकाने विनंती केली असता आरोपी याने फिर्यादी यांच्यासोबत अरेरावीची भाषा करण्यास सुरुवात केली.त्यावेळी तेथील बसलेल्या प्रवाशांनी आरोपी यांस समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे न ऐकता आरोपी हा फिर्यादी यांच्या अंगावर येऊन मानेला नखाने ओरबडुन धक्काबुक्की करून फिर्यादी यांच्या अंगावरील गणवेशाचा शर्ट फाडला. गुन्ह्याप्रकरणी जालगावकर यांच्याविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.