| परभणी | प्रतिनिधी |
परभणीच्या पाथरी-सोनपेठ मार्गावरील जैतापूर वाडीजवळ मंगळवारी (दि.22) बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली असून, हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी ही बसच्या समोरील भागात अडकून अनेक फूट फरफटत गेली आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर एसटी बस थेट शेतात जाऊन थांबली.
मिळालेल्या माहितीनुसार, एस.टी. महामंडळ पाथरी आगाराची बस सकाळी पाथरीहून सोनपेठच्या दिशेने जात होती. पाथरी सोनपेठ रस्त्यावर जैतापूर वाडीजवळ या बसला अपघात झाला. त्यावेळी समोरून पाथरीकडे येणाऱ्या दुचाकी आणि बसची जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील लतिफ पठाण (56) आणि शेख अनवर शेख नूर (39) रा. इंदिरानगर हे दोघेही जागीच ठार झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बसच्या पुढच्या भागात दुचाकी अडकून बससोबत दुचाकी फरफटत पुढे गेली होती. अपघात होताच बस रस्त्याच्या कडेला एका शेतात जाऊन थांबली. सुदैवाने बस मधील कोणाला मार लागला नाही, पण दुचाकीवरील दोघांच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लांडगे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.





