एसटी बसमधील दहा प्रवासी जखमी
| नागोठणे | वार्ताहर |
रखडलेल्या महामार्गाची सध्या पावसामुळे दुर्दशा झालेली असतांनाच अपघातांचे सत्र ही सुरूच आहे. यातच नागोठण्याजवळील कोलेटी येथे एसटी बस व मालवाहू आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात टेम्पोच्या केबिनला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन केबिन मध्ये अडकून पडलेला टेम्पो चालक दिनेश यादव हा गंभीर जखमी होऊन त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. टेम्पोत अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिकांनी लोखंडी साखळीच्या सहाय्याने टेम्पोचा आतील भाग मागे ओढून मोकळे केले. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी(दि.1) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवथरघळ – ठाणे असा प्रवास करणाऱ्या एसटी बसचा चालक दिनकर डोंगरे (36) रा. जिल्हा लातूर हा ठाणे आगाराची एस.टी. बस शिवथरघळ ते ठाणे अशी 50 प्रवासी घेऊन ठाणे येथे जात होता. बस अपघात ठिकाणी आली त्याठिकाणी एकेरी रोड असल्याचे माहिती असून, सुध्दा त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी बस अतिवेगाने चालवून मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे येणाऱ्या आयशर टेम्पोला समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात आयशर टेम्पो चालक दिनेश वासुदेव यादव (48) रा. वापी, गुजरात याच्या उजव्या पायास गंभीर जखमा होऊन त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.आदित्य शिरसाट यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
तसेच एस टी बस मधील जखमी प्रवाशांमध्ये 1) जमील मोहम्मद अली येलूकर (21) रा. माणगाव, सोनू शीद (54) रा.माणगाव, अनघा सावंत (55) रा. महाड, सायली कोंढाळकर (20) रा. महाड, निर्मिती कडू (19) रा. माणगाव, आर्या साळुंखे (22) रा. माणगाव, संतोष शिंदे (52) रा. महाड, मुकुंद कदम (25) रा. महाड, रोहिणी भोनकर (25) रा. माणगाव, सोनाली शिंदे (48) रा. माणगाव असे दहा प्रवासी जखमी झाले असून, त्यांना किरकोळ दुखापती व मुक्का मार लागला आहे. जखमी प्रवाशांवर प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करीत आहेत.
