जुन्याच बसमधून प्रवास सुरू; पर्यटक, प्रवाशांकडून संताप व्यक्त
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरूड जंजिरा एसटी बस आगारासाठी देण्यात आलेल्या सर्व जुन्या बसेसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खिळखिळ्या झालेल्या बसद्वारे वाहतूक सुरू आहे. आगारात 34 एसटी बस कार्यरत असून, त्या जुन्या झाल्या आहेत. नवीन गाड्या मिळत नसल्याने नाइलाजास्तव जुन्याच बस चालू ठेवाव्या लागत आहेत. त्याचा त्रास चालक, वाहक आणि प्रवाशांना सोसावा लागत आहे. त्याचप्रमाणे आगाराची दुरवस्था आणि कर्मचाऱ्यांची कमतरता याचा परिणाम वाहतूक सेवेवर होत असल्याने आगाराला घर घर लागल्याचे चित्र असून, सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
जुन्या नादुरुस्त होणाऱ्या बसेसमुळे प्रवासी हैराण झाले असून, कधीही काहीही होऊ शकेल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रोज प्रवास करणारे असंख्य प्रवासी, विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली दिसून येत आहेत. आगारात कर्मचारी संख्यादेखील अपुरी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर दुहेरी ताण पडत आहे. वर्कशॉप, चालक, वाहक संख्या अत्यंत अपुरी आहे. सुरक्षित आणि नियोजनबद्ध कामकाज चालण्यासाठी मुरूड आगारात मंजूर एकूण 170 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात आगारात 137 कर्मचारी उपलब्ध आहेत. येथून सेवानिवृत्त किंवा बदलून गेलेल्या कर्मचाऱ्याच्या जागीदेखील दुसरा कर्मचारी पाठविला जात नाही. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी करावी लागत आहे.
मुरूड एसटी आगराचे व्यवस्थापक राहुल शिंदे यांना आगराच्या एकूण परिस्थितीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, मुरूड आगारातून मुंबई, पुणे, अलिबाग, रोहा, शिर्डी, बोरिवली, महाड, तळा, धुळे या मार्गावर प्रवासी सेवा दिली जाते. आगारातून एकूण 34 फेऱ्या चालविल्या जातात. त्यासाठी 34 बसेस उपलब्ध असून, सर्व बसेस जुन्या आहेत. फक्त 5 एशियाड बस उपलब्ध असून, त्यादेखील जुन्याच आहेत. एकूण 29 लालपरी बसेस असून, या 9 मीटर लांबीच्या आणि 12 टन वजनाच्या आतील आहेत. नवीन 12 मीटर लांबीच्या एसटी गाड्यांना अनेक ठिकाणी टर्न बसत नसल्याने मुरूड आगाराकडे दिल्या जात नाहीत. आमच्याकडून नवीन 9 मीटर लांबीच्या बसेसची मागणी मुख्य कार्यालयाकडे करण्यात आली आहे; मात्र या नवीन बसेसची बांधणी सुरू असल्याने त्या कधी येतील ते आताच सांगता येणार नाही. आगारातील रखडलेले काँक्रिटीकरणदेखील जैसे थे आहे.
प्रवाशांची हेळसांड मुरूड आगारात प्रवाशांसाठी नवीन सुसज्ज टॉयलेट आणि वॉशरूम मुरूड नगरपरिषदेचे विकास निधीतून मंजूर केले आहे. मात्र, अंतिम मंजूर पत्रावर पालकमंत्री उदय सामंत यांची स्वाक्षरी नसल्याने ते काम सुरू झालेले नाही. एसटी आगारातील दर्शनी प्रवेशद्वाराजवळ कित्येक दिवसांपासून दगड, खड्डे उखडले असून प्रवाशांना त्रास होत आहे. शिवाय, आगाराचा परिसरदेखील विद्रुप दिसत आहे. प्रलंबित प्रश्न, आगारातील स्वच्छता आदी प्रश्नांवर आपण पाठपुरावा सुरू केला आहे, अशी माहिती व्यवस्थापक राहुल शिंदे यांनी दिली.
मुरूडकडे येणारा अलिबाग-मुरूड मार्ग खराब असल्याने आमच्या कर्मचारी, प्रवाशांना खूप त्रास होतोय. गाड्या नादुरुस्तीचे प्रमाण वाढते आहे. त्या प्रमाणात पुरेसा स्टाफ गरजेचा आहे. वर्कशॉप विभागात 6 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सुमारे 35 वाहन चालक, वाहक कमी आहेत. मुरूड आगाराचे रोजचे प्रवासी उत्पन्न सुमारे 3 ते 4 लाख आहे. 15 नवीन कर्मचारी देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष मागणीनुसार संख्या कमीच आहे.
राहुल शिंदे, आगार व्यवस्थापक