हातगाडीसह फुलांचे नुकसान
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागहून महाजनेकडे जाणाऱ्या एसटी बसची रस्त्याच्या बाजूला असलेल्या हातगाडीला जोरदार धडक लागली. या धडकेत फुल विक्रेती महिला जखमी झाली असून त्यांचे खुप आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
अलिबाग एसटी बस आगारातून दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजण्याच्या सुमारास एसटी बस (एमएच-14-बीटी-2620) महाजनेकडे निघाली. चार वाजण्याच्या सुमारास कुरुळ येथे आल्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या हातगाडीला जोरदार धडक लागली. या धडकेत फुल विक्रेती महिला गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हातगाडीसह फुलांचे नुकसान झाले. स्थानिकांनी बस चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान अलिबाग-बेलकडे रस्त्यावर एका बाजूने वाहतूक कोंडी झाली होती.
फुल विक्रेत्या महिलेचे नाव सुरेखा रोटकर असून नवरात्रौत्सवानिमित्त कुरुळ येथील रस्त्याच्या बाजूला स्थानकाजवळ फुल विक्रीचे काम त्या करीत होत्या. त्यावेळी हा अपघात झाला. सुदैवाने मोठी हानी टळली.