एसटी चालक, वाहकाला मारहाण

| तळा | वार्ताहर |

तळा-रोवळा-वाशी एसटी बस घेऊन जात असलेल्या चालक व वाहकाला बोरभाटला आदिवासी येथे क्षुल्लक कारणावरुन मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, आरोपीला तात्काळ अटक करा, असे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिले आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसचालक सचिन जंगम व वाहक सुनील शेडगे तळा-वाशी गाडी घेऊन जात असताना तळा येथे दोन प्रवाशांनी रस्त्यात हात दाखवला असता जागेअभावी त्यांना पुढे येण्याची विनंती वाहक यांनी केली. त्यानंतर शहरातील कॉर्नरवर गाडी उभी करून प्रवाशांना घेतले. पैकी एक गाडीत बसला व एकजण दारूच्या नशेत होता. त्याने दरवाजात वाहकाला गळपट्टी धरून व लाथ मारून खाली उतरून गेला. बस वाशीकडे गेली व येताना सदर इसमाने आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना फोन करून जमवून रस्त्यावर मोटारसायकली आडव्या घालून रस्ता रोखून गाडीत शिरून चालक व वाहक यांना पुरूष, महिलांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवगाळी केली.

फिर्यादी वाहक सुनील शेडगे यांनी तळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक माणगाव राजेंद्र पाटील यांनी भेट देऊन ताबडतोब आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज खराडे करीत आहेत.

Exit mobile version