चित्रलेखा पाटील यांच्यासह ॲड. मानसी म्हात्रे यांची उपस्थिती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष पेझारी, मृदूल म्हात्रे मित्र मंडळ आयोजित दहिहंडी उत्सवाचे आयोजन शनिवारी (दि. 5) दुपारी करण्यात आले. ढोलपाडा-आंबेपूर येथील नुतन हनुमान क्रिडा मंडळाच्या मैदानात या उत्सवाचा शुभारंभ झाला. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती या सोहळ्याचा उद्घाटन झाले. यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, अलिबागच्या नगरसेविका ॲड. निलम हजारे, शेकापच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,शेकापचे पदाधिकारी मृदूल म्हात्रे मित्र मंडळाचे पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येेने उपस्थित होते.
दुपारपासून सुरु झालेल्या हा सोहळा थेट पाहण्यासाठी पेझारी नाका परिसरात प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती. एक वेगळा उत्साह या निमित्ताने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आला. गोविंदा रे गोपाळा अशा अनेक मराठी, हिंदी गाण्याच्या ठेक्यावर नाचत दहीहंडीचा जल्लोष साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये पाच व त्यापेक्षा अधिक थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना तीन हजार रुपये, चार व त्यापेक्षा अधिक थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकांना तीन हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. त्यामुळे सलामीसाठी मानवी मनोरे रचण्याचा साहरी प्रयत्न असंख्य गोविंदा पथकाने केला. तसेच दहीहंडी फोडणाऱ्या पुरुष गोविंदा पथकासाठी एक लाख रुपये तसेच महिला गोविंदा पथकासाठी तीस हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले.
पेझारीमध्ये दहीहंडी उत्सवाचा अभुतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला. गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषाने आणि ढोल ताशांच्या गजराने परिसर दुमदूमून गेले. दहीहंडी उत्सवात यावर्षीही गोविंदा पथकामध्ये कमालीचा उत्साह व जल्लोष तसेच नवनवीन विक्रम रचण्याची जिद्द दिसून आला.






