90 टक्के वेतनावर एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी

दिवाळीपूर्वी पगार देण्याची घोषणा; उर्वरित 10 टक्क्यांबाबत संभ्रम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीपूर्वी वेतन देण्याची घोषणा करणाऱ्या एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण घातले आहे. नोव्हेंबरचे वेतन दिवाळीपूर्वी खात्यात जमा झाले खरे; मात्र पूर्ण वेतनाऐवजी केवळ 90 टक्केच रक्कम मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. उर्वरित 10 टक्के वेतन कधी मिळणार, असा सवाल कर्मचारी उपस्थित करत आहेत.

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या रायगड विभागांतर्गत 19 बसस्थानके असून, जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये चालक, वाहक, मेकॅनिक आणि अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. साधारणपणे दर महिन्याच्या सात तारखेला वेतन जमा होते. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने यंदा नोव्हेंबरचे वेतन सणापूर्वी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिवाळीच्या चार दिवस आधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा झाले. त्यामुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, प्रत्यक्षात 100 टक्क्यांऐवजी 90 टक्केच वेतन मिळाल्याने हा आनंद अल्पकाळ टिकला. तुटपुंज्या वेतनावर काम करणारे चालक, वाहक, मेकॅनिक आणि अन्य कर्मचारी वेळेचे बंधन न पाळता सेवा बजावत असतात. अशा परिस्थितीत पूर्ण वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उर्वरित दहा टक्के वेतन कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रजा, इतर बाबी तपासून उर्वरित वेतन
एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात आले आहे. रजा आणि इतर बाबींचा विचार करून सध्या पूर्ण वेतन देण्यात आलेले नाही. संबंधित बाबींची तपासणी करून उर्वरित वेतन दिले जाईल, अशी माहिती रायगड विभागाचे आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी दिली.
Exit mobile version