| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावात एसटी बसला भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी बसची धडक लागून झालेल्या अपघातात एसटी बसचा चालक जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. हा अपघात शुक्रवार, दि. 21 रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद एसटी चालक नितीन शरद चौधरे (36) रा. श्रीवर्धन एसटी डेपो, मूळ रा. चौसाळा, जि. बीड यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, एसटी चालक नितीन शरद चौधरे हे त्यांच्या ताब्यातील एसटी (एमएच-06-डीडब्ल्यू-8011) ही गाडी मुंबई सेंट्रल येथून गोरेगावमार्गे बागमांडला श्रीवर्धन येथे घेऊन जात असताना, त्यांची गाडी माणगावात मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्यावर माणगाव काळ नदीच्या पुलापुढे राऊत हॉस्पिटलच्या जवळ आली असता आरोपी नासीर अहमद शेख (48) रा. गोवा यांनी त्यांच्या ताब्यातील खासगी बस (जीए-05-एफ-0001) ही गाडी आतिवेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालवून फिर्यादी यांच्या ताब्यातील एसटी बसला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी एसटी बस चालकाला दुखापती होऊन ते जखमी झाले. तसेच, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन आरोपी खासगी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश समेळ हे करीत आहेत.