। मुंबई । प्रतिनिधी ।
कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने एसटी कर्मचार्यांनी गेल्या आठ दिवसांपासून संप पुकारला आहे. आठवडा उलटून गेला तरी सरकार कोणताही निर्णय घेत नसल्याने कर्मचार्यांचा संप चिघळत असल्याचं आता समोर येत आहे. एसटी कर्मचार्यांच्या मागण्यांवर तोडगाच निघत नसल्यानं मुंबईत 3-4 संपकरी महिला कर्मचार्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यावेळी आंदोलनकर्त्या महिला कर्मचार्यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
पोलिसांनी या महिलांना वेळीच रोखल्याने पुढचा अनर्थ टळला. कामगारांच्या प्रश्नावर काहीच तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांची उद्विग्नता वाढत चालली आहे. एसटी संपाचा आज आठवा दिवस आहे. आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. मागच्या आठ दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेर्या सुरू आहेत. मात्र अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.