वातानुकूलित बसेससाठी सवलत देण्याची मागणी
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
डायलिसिस रुग्णांसाठी महाराष्ट्र शासनाने एस टी बसने उपचार आणि तपासणीसाठी राज्यात विनामूल्य प्रवास सवलत योजना लागू केली आहे. परंतु, सदरची योजना काही अंशी फक्त कागदोपत्री असल्याचे निदर्शनास येत असून, श्रीवर्धन तालुक्यातील डायलिसिस रूग्णांनी या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी योजनेअंतर्गत डायलिसिस रुग्णांना उपचारासाठी जिल्हा किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी राज्यभरातील एसटी बसने विनामूल्य प्रवास करण्याची सवलत दिली जाते. परंतु, सदरची विनामूल्य प्रवास सवलत ही केवळ शंभर किलोमीटर अंतरापुरती मर्यादीत आहे आणि रुग्णांना शंभर टक्के सुट दिली जाते पण ती फक्त महिन्यातील दोन फेऱ्यांसाठी, मात्र इतर वेळी पुर्ण तिकीट भाडे रुग्णांना द्यावे लागते. यामध्ये ही सदरचा प्रवास हा साध्या बस पुरता असल्याने याचा त्रास श्रीवर्धन तालुक्यातील डायलिसिस रुग्णांना सहन करावा लागतोय.
श्रीवर्धन तालुक्यातील डायलिसिस रुग्णांना उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात आठवड्यातून तीन वेळा जावे लागते. श्रीवर्धन आगारातून मुंबई कडे जाणाऱ्या व येणाऱ्या साध्या बसेस चे प्रमाण कमी करीत जवळपास सर्वच बसेस शिवशाही आणि स्लीपर कोच पाठवण्यात येतात. डायलिसिस रुग्णांना पनवेल येथे उपचार घेण्यासाठी जायचे असेल तेव्हा साध्या बसच्या वेळापत्रकानुसार जावे लागते. शिवशाही व स्लिपर कोच बसेस साठी डायलिसिस रूग्णांना श्रीवर्धन ते पनवेल मार्गावरील पुर्ण दरांत तिकीट भाडे द्यावे लागते तर साध्या बससाठी तिकीट भाड्यात शंभर टक्के सुट आहे. परंतु, श्रीवर्धन ते वडखळ हे अंतर शंभर किलोमीटर इतके होत असून रुग्णांना वडखळ ते पनवेल मार्गावर पुर्ण तिकीट भाडे द्यावे लागते. श्रीवर्धन ते मुंबई मार्गावर श्रीवर्धन आगाराने अनेक साध्या बसेसच्या फेऱ्या ऐवजी शिवशाही व स्लीपर कोच पाठवण्यात येत आहेत. याचा फटका डायलिसिस रूग्णांना होत असुन साध्या बसेस प्रमाणेच या बसेसच्या तिकीट भाड्यात आम्हाला शंभर टक्के सुट द्यावी अशी मागणी सदरच्या रूग्णांकडून होत आहे.
आठवड्यातून तीन वेळा पनवेल येथे डायलिसिस उपचारासाठी जातो. साध्या बससाठी आम्हाला शंभर टक्के सुट दिली जाते पण ती फक्त महिन्यातून दोन वेळा. इतर वेळी मला पुर्ण तिकीट भाडे द्यावे लागते.आम्हालाही सर्व प्रकारच्या बसेससाठी शंभर टक्के सुट द्यावी व ती सुट मर्यादित दोन वेळेसाठी नसावी तर कायमस्वरूपी असावी.
-रितेश तोडणकर,
दांडा श्रीवर्धन






