। पेण । संतोष पाटील ।
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात धावणार्या एसटीच्या प्रवाशांसाठी असणार्या सर्व योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे.पेण येथील एसटी आगारात आपत्कालीन परिस्थितीत, अपघात समयी उपयोगी पडावी यासाठी एसटीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रथमोपचार पेटया एसटीतून गायब झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आगीसारख्या संकटसमयी अत्यावश्यक असलेली अग्निशामक यंत्रणाही धूळ खात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
याबाबत पेण आगारातील वेगवेगळया दहा गाडयांमध्ये पाहणी केली असता खुपच विदारक चित्र पहायला मिळाले. पहिल्या चार गाडयांनमध्ये तर आग विझविण्यासाठी वापरण्यात येणारे सिलेंडरसुध्दा नव्हते. तर पेण आगारातील सहा गाडयांमध्ये अग्निशामक यंत्रणे आढळली. परंतु कोणत्याच गाडयांमध्ये प्रथमोपचार पेटया पहायलाच मिळाल्या नाही. ज्या एक दोन गाडयांमध्ये पेटया होत्या परंतु त्या रिकाम्या व धुळीने भरलेल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी एसटीने गाजावाजा करून सुरू केलेल्या अनेक योजना केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत नाही, हेच खरं आहे.
रायगड जिल्हयातील अलिबाग, मुरूड, रोहा, महाड, माणगाव, पेण, रामवाडी, कर्जत आगरातून लांब पल्ल्यांच्या शेकडो बस दररोज धावतात. एसटीच्या तिकिटाचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे असल्याने तसेच एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचा विश्वास प्रवाशांमध्ये असल्याने एसटीचा प्रवास करणार्यांची संख्या मोठी आहे. परिणामी रायगड जिल्हयातील आगार हे इतर इतर आगाराच्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळविते. मात्र, प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर हे ब्रीद वाक्य घेउन धावणार्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येतात का, महामंडळ खरोखर प्रवाशांच्या जीवाची किती काळजी घेते, हा प्रश्न सध्याची एसटी ची अवस्था पाहता ऐरणीवर आला आहे.
वायफाय सेवा बंदच
प्रवासादरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी एसटीमध्ये वायफाय बसविण्याची योजना सुरू करण्यात आली होती. महामंडळाने यंत्र मिडिया सोल्यूशन या खासगी कंपनीच्या माध्यमातून 18 हजार गाडयांमध्ये वायफाय सुविधा सुरू केली होती. त्यानंतर एसटीचा प्रवास, मनोरंजन हमखास, अशी जाहिरातबाजीही केली होती. मात्र सर्वच गाडयांमधील वायफाय बंद पडल्याचे दिसून येत आहे व त्या ठिकाणी वेगवेगळया खासगी प्राडक्टच्या जाहिराती लावल्या आहेत.
प्रथमोचार साहित्य आवश्यक
प्रवासा दरम्यान आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बसमधील प्रवाशांना तातडीने प्रथमोपचार मिळावेत, या उद्देशाने प्रत्येक एसटीमध्ये प्रथमोपचार पेटया बसविण्यात आल्या आहेत. यामध्ये ड्रेसिंगसाठी मलम, कॉटनपट्टी असे साहित्य असते. चालकाच्या केबिनमध्ये ही पेटी ठेवलेली असते. काही बसमधून या पेटया गायब झाल्या आहेत. तर काही पेटयांमध्ये धूळ भरलेली तर काही पेटयांचे फक्त अवशेष पहायला मिळाले. प्रथमोपचाराच्या पेटयांमध्ये आवश्यक साहित्यच असावे आणि त्या पेट्या सुरक्षित ठेवाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांची असते परंतु आज प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने एसटी महामंडळ कार्यरत नाही, असेच म्हणावे लागेल.
एसटीतील प्रवाशांची सुरक्षता ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे बसमध्ये प्रथमोपचार पेट्या असायलाच हव्यात. त्याचप्रमाणे आगविरोधक यंत्रणेदेखील योग्य स्थितीत गाडयांमध्ये असणे आवश्यक आहे. जर अशी व्यवस्था नसेल तर प्रत्येक तालुक्यात आगार प्रमुखाचा येत्या दोन दिवसात रिपोर्ट घेतो. मी कार्यभार सांभाळून जेमतेम 10 ते 12 दिवस झाले आहेत. त्यामुळे येत्या 8-10 दिवसात सर्व माहिती घेउन गाडयांमधील प्रथमोपचार पेटया व अग्निविरोधक यंत्रण नव्याने सज्ज करून घेतो.
दिपक घोडे,विभागीय नियंत्रण,रायगड