दीड लाख प्रवाशांनी केला प्रवास
| अलिबाग | प्रमोद जाधव |
रक्षाबंधनाच्या दिवशी जिल्ह्यातील महिलांसह अन्य प्रवाशांनी एसटीला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. एका दिवसात एक लाख 50 हजार 543 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामध्ये 50 टक्क्यांहून अधिक महिलांनी एसटीतून प्रवास केला आहे. एका दिवसात एसटीला 56 लाख 21 हजार 808 रुपये इतके उत्पन्न मिळाले. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात 56 लाखांची भर पडल्याचे विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारीत अलिबाग, पेण, कर्जत, माणगाव, महाड, श्रीवर्धन, मुरूड व रोहा या आठ आगारांचा समावेश असून, जिल्ह्यात 19 बसस्थानके आहेत. 377 हून अधिक एसटी बसेस असून, अडीच हजार कर्मचारी आहेत. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या आहेत. सध्या महिलांसाठी अर्धे तिकीट योजना सुरु केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. नोकरी व कामानिमित्त जाणाऱ्या महिलांना या योजनेचा चांगला आधार मिळत आहे.
जिल्ह्यामध्ये शनिवारी (दि.9) रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या दिवशी एक लाख 50 हजार 543 प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला. एकूण एक लाख 40 हजार 523 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. एका दिवसात एसटीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एका दिवसामध्ये 56 लाख 21 हजार 808 रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले. गतवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील एसटीला 50 लाख 38 हजार 124 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षाच्या तुलनेने यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी पाच लाख 83 हजार 684 रुपये इतकी उत्पन्नात वाढ झाल्याचे चित्र आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
चार दिवसांत दोन कोटी उत्पन्न
रायगड जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (दि.8) नारळी पौर्णिमा, शनिवारी (दि.9) रक्षाबंधन, तसेच रविवारी (दि. 10) व सोमवारी (दि. 11) या चार दिवसांच्या कालावधीत सहा लाख, पाच हजार 40 प्रवाशांनी प्रवास केला. या प्रवाशांच्या माध्यमातून एसटीला चार दिवसांमध्ये दोन कोटी 17 लाख 48 हजार 222 रुपयांचे उत्पन्न मिळाले.
रायगड जिल्ह्यामध्ये शुक्रवार ते सोमवार या कालावधीत सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. एसटीला चार दिवसांत चांगले उत्पन्न मिळाले आहे. चांगला प्रतिसाद प्रवाशांकडून मिळाला आहे.
दिपक घोडे,
विभाग नियंत्रक, रायगड







