। दिघी । वार्ताहर ।
कोरोना काळापासून पूर्वपदावर आल्यानंतर श्रीवर्धन एसटी आगारातून मुंबईकडे जाणार्या सर्व बसेस सुरू केल्या होत्या. मात्र, सध्या प्रवासी नसल्याचे कारण देत त्या बसेस पुन्हा बंद केल्या आहेत. याबाबत प्रवाशांमधून श्रीवर्धन आगाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सद्यःस्थितीत श्रीवर्धनवरून बोर्लीपंचतनमार्गे फक्त चार एसटी बसेस मुंबईकडे जात आहेत. रात्री मुंबईला जाण्यासाठी बस होती. मात्र, अल्प उत्पन्नाचे कारण देत तीदेखील बंद केली. त्यामुळे दुपारी दोननंतर बोर्लीपंचतनवरून मुंबईला जाण्यासाठी कोणतीही सोय राहिली नाही. याशिवाय मुंबईवरून गावी येण्यासाठी असलेल्या फेर्यादेखील रद्द केल्या आहेत. सकाळच्या बस सुटल्यावर थेट रात्रीच्या बस आहेत. दिवसभरात एकही बस नाही, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. वेळी-अवेळी प्रवासाला निघाल्यास एसटी सेवेचा मोठा फायदा प्रवाशांना होतो. याशिवाय एसटीचे उत्पन्नदेखील वाढते. मात्र, एसटी बसच बंद केल्याने एसटीकडे जाणारा प्रवासी वर्ग आणखी दुरावला जात आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे निदर्शनास येत आहे.
खासगी वाहतूकदारांची चंगळ
पहाटे चार वाजता मुंबईला जाण्यासाठी बोर्लीपंचतनवरून एसटी होती. मात्र, प्रवासी नसल्याचे कारण देत कोणतीही पूर्वसूचना न देता थेट फेरी रद्द केली. परंतु, त्याच वेळेवर सुटणार्या खासगी बसेस पूर्ण प्रवासी भरून जातात. मुंबईत ऑफिसला वेळेत पोहोचण्यासाठी या बसचा चाकरमान्यांना फायदा व्हायचा, शिवाय तिकीट कमी असल्याने प्रवासी एसटीला पसंती द्यायचे.
एसटीच्या वेळांचा पत्ताच नाही
‘वाट पाहीन पण एसटीनेच जाईन’ असा हट्ट करणारे प्रवासी आहेत. मात्र, कधी एसटी सुरू, कधी बंद यामुळे प्रवाशांत एसटी प्रशासनाविरोधात नाराजी आहे. खासगी वाहतूकदारांसारखे एसटी प्रशासन प्रवाशांना एसटीच्या वेळेबाबत आवश्यक माहिती देण्यास अपयशी ठरते आहे. त्यामुळे एसटीच्या भरोवशावर राहण्यापेक्षा लोक खासगी वाहनांनी प्रवास करणे पसंत करतात.
दहा हजारांहून अधिक लोकसंख्या, चाळीसहून अधिक गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेले बोर्लीपंचतन हे शहर. मात्र, सातत्याने मागणी होऊनसुद्धा येथे तात्पुरते का होईना एसटी बसस्थानक नाही. कर्मचारी किंवा अधिकार्याची नेमणूक नाही. ऐन सणासुदीच्या दिवसाला प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
– प्रवीण वडके, प्रवासी
कमी प्रवासीसंख्या व अल्प उत्पन्नामुळे काही एसटी फेर्या आम्ही रद्द केल्या आहेत. मात्र, आता विविध सण सुरू होत असल्याने टप्प्या-टप्प्याने सर्व बस फेर्या सुरू केल्या जातील.
– तेजस गायकवाड, आगारप्रमुख, श्रीवर्धन