एसटी कर्मचारी आक्रमक

पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक
। मुंबई । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर शुक्रवारी एसटी कर्मचार्‍यांनी उग्र आंदोलन केली. यावेळी एसटी कामगार्‍यांकडून पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. यावर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, की आपण एसटी कामगारांच्या पाठीशी आहोत.चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. एसटी कामगारांचे एकही अधिवेशन माझ्याकडून चुकलेले नाही, अशी टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही.

कायदा हातात घेऊन कोणाच्या हाती काही लागणार नाही. मात्र, या आंदोलनात दोषींवर कायदेशीर कारवाई होईल, कोणाची माथी भडकवली जात आहेत, त्याला कामगारांनी बळी पडू नये, असं आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले. तर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, तसेच घरावर आंदोलन करणार्‍यांमध्ये दोषी असणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असं ठाकरे यांनी सांगितले. राज्यात एसटी कामगारांच्या आडून राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे याची कसून चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरांवरील आंदोलन समर्थनीय नाही, असं भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचार्‍यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोंच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यावेळी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील मोठ्या फौजफाट्यासह सिल्वर ओकमध्ये दाखल झाले. आणि आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू झाली. या संपकरी कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या.


मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांशी बोलण्यासाठी शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे बाहेर आल्या. यावेळी त्यांनी सर्वांनी शांत राहावे. कुणीही दगडफेक आणि चप्पलफेक करू नये. माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहे, त्यांची सुरक्षा माझ्यासाठी महत्त्वाची आहे. मी सर्वांचे म्हणणे ऐकायला तयार आहे, फक्त त्यांनी शांत राहावे. मात्र, संतप्त आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते. प्रथम मी मुंबई पोलिसांचे मी आभार मानते, त्यांनी आमचे संरक्षण केले आहेत, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले. कर्मचार्‍यांची संख्या शेकडोंच्या घरात असल्याने पोलिसांनी पोलीस व्हॅनसह स्कूलबस मागवल्या, त्यात पुरुषांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. तर, अनेक कामगार सरकारविरोधात घोषणाबाजी देत विलिनीकरणाची मागणी करत होते. विलिनीकरणाशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असं ही आंदोलक घोषणा देत होते.

Exit mobile version