जिल्ह्यातील सर्वच आगारातून अंशतः एसटी सुरु

25 दिवसांनी अलिबाग आगारातून मुरुड, पेण फेर्‍या
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आठ डेपातून एसटी फेर्‍या अंशतः सुरु करण्यात प्रशासनाला यश आले आहे. 2 डिसेंबर रोजी रायगड विभागातून तब्बल 103 फेर्‍या मार्गस्थ झाल्या. मुरुड पाठोपाठ अलिबाग आणि कर्जत या डेपातून देखील एसटी फेर्‍या सुरु करण्यात प्रशासनाला यश आले आहे. अलिबाग डेपोतून पेण आणि मुरुडकडे एसटी रवाना झाली. कमी प्रवाशी असली तरी हळूहळू चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 880 कर्मचारी कामावर हजर झाले होते. त्यापैकी 323 पुन्हा संपात सहभागी झाल्याने 557 कर्मचारी सेवेत उरले आहेत. दरम्यान, संपामुळे विद्यार्थी तसेच नोकरदार, मजूर, रुग्ण यांचे हाल होत असल्याने आता प्रवाशांनी पुढाकार घेऊन संपकरी कर्मचार्‍यांची समजूत काढण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


आपल्या विविधी मागण्यांसाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचा आजचा 25 वा दिवस. सरकारने बहुतेक मागण्या पुर्ण केल्या तरी आपले आंदोलन सुरुच ठेवल्याने प्रवाशांचे मोठया प्रमाणावर हाल सुरु आहेत. खाजगी वाहतूकदार अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असल्याने प्रवाशांना कोणीच वाली उरलेला नाही. रायगड परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी मात्र आपले प्रयत्न सुरुच ठेवले असून त्यांच्या प्रयत्नांतून पेण, महाड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, अलिबाग, कर्जत आणि मुरुड या आठही आगारातून एसटी सेवा सुरु करण्यात त्यांना अंशतः यश आले आहे. गुरुवारी पेण आगारातून सर्वाधिक 50, महाड आगारातून 14, रोह्यातून 13, श्रीवर्धन व माणगाव आगारातून प्रत्येकी 11 तर अलिबाग आणि कर्जत आगारातून प्रत्येक 2 फेर्‍या सोडण्यात यश आले आहे.
25 दिवसांनंतर आज अलिबाग आगारातून अलिबाग पेण विनावाहक एसटी बसमधून 12 प्रवाशांनी प्रवास केला तर अलिबाग मुरुड एसटी बसमधून 2 प्रवाशांनी प्रवास केला. अलिबाग आगारातील 2 चालक, 5 कार्यशाळा कर्मचारी तर 8 प्रशासकीय कर्मचारी असे 15 कर्मचारी कामावर हजर झाले असल्याची माहिती अलिबाग आगारप्रमुख वनारसे यांनी दिली. अलिबाग आगारातील चालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हेल्मेट परिधान करुन आपले कर्तव्य बजावले. यावेळी सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी तसेच सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version