न्यायालयाकडून 22 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत
कर्मचार्यांकडून फटाके फोडून आनंदोत्सव
| मुंबई | प्रतिनिधी |
गेले पाच महिने सुरु असलेला संप मिटला की नाही मिटला याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असली तरी येत्या काही दिवसात एसटी पूर्ण क्षमतेने धावू लागेल,असा विश्वास वाटू लागला आहे.
गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचार्यांनी कामावर हजर व्हा,कसोटीच्या काळात उपजिविकेचे साधन गमावू नका, असे आवाहन केले होते.त्यानंतर लगेच राज्यात संपकरी एसटी कर्मचार्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून आनंदोत्सवही साजरा केला.त्यामुळे हे कर्मचारी आता कामावर तातडीने हजर होणार की 22 एप्रिलपर्यंत पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
22 एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर हजर होतील, यांच्यावर कुठलीही कारवाई आम्ही करणार नाही. जे कामगार न्यायालायाने दिलेल्या मुदतीत कामावर हजर होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मार्ग मोकळा आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. – अनिल परब, परिवहनमंत्री
गेली पाच महिने हा जो संप सुरू होता. कर्मचार्यांचं देखील प्रचंड मोठं नुकसान झालय, एसटीचं देखील नुकसान झालय. आज मी पुन्हा एकदा कर्मचार्यांना विनंती करतो, उच्च न्यायालायने जे निर्देश दिलेले आहेत, त्यानुसार आपण कामावर रूजू व्हावं आणि एसटी पुन्हा एका महाराष्ट्राच्या जनतेसाठी पूर्ववतपदावर यावी. असं देखील परिवहनमंत्री अनिल परब यांनी बोलून दाखवलं.
रायगडात 800 कर्मचारी अजूनही संपात
संप मिटला की नाही मिटला याबाबत परिवहन विभागाचे अधिकारीही संभ्रमावस्थेत आहेत.गुरुवारी संप मिटल्याचे जाहीर करीत आगारातील कर्मचार्यांनी फटाके फोडून,गुलाल उधळून आनंद साजरा केला.त्यामुळे सर्व कर्मचारी येत्या दोन दिवसात कामावर हजर व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा रायगडच्या विभागीय नियंत्रण अनघा बारटक्के यांनी व्यक्त केली.सध्या रायगड विभागातील 800 कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत.तर 1000 कर्मचारी कामावर येत आहेत.सध्याचे दररोजचे उत्पन्न 17 लाखांच्या आसपास असल्याचे बारटक्के यांनी सांगितले.
