St strike! सरकारवर विश्‍वास ठेवा, कामावर परत या- शरद पवार

। मुंबई । प्रतिनिधी ।
सरकारवर विश्‍वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील. असं आवाहन शरद पवारांनी एसटी कर्मचार्‍यांना केलंय. तर एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे समितीच्या अहवालानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असं पवार म्हणाले.

आपली बांधिलकी ही प्रवाशांशी आहे, ही बाब एसटी कर्मचार्‍यांनी ध्यानात ठेवावी. राज्य सरकार तुमच्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे. मागण्या करण्यात काहीही गैर नाही. पण मागण्या मांडताना कुठपर्यंत जावं, याचं तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. एसटी कृती समितीतील संघटनांनी हे तारतम्य बाळगत संप मागे घेण्याची हाक दिली आहे. परिवहनमंत्र्यांनीही मागणयांविषयी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार करत संप मागे घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

शरद पवार आणि अनिल परब यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचार्‍यांच्या 22 संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी एसटी कर्मचार्‍यांना सामोपचाराची भूमिका घेऊन संप मागे घेण्याचे आवाहन केले. गेल्या दोन महिन्यांत एसटीच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांचे मोठ्याप्रमाणावर हाल झाले आहेत. दोन लाटांनंतर करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. या सगळ्याचा राज्याच्या अर्थकारणावर कुठेतरी परिणाम होत असतो. अशा परिस्थितीमध्येही परिवहनमंत्री आणि एसटीच्या अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना शक्य तितके जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता कर्मचार्‍यांनी कामावर पुन्हा रुजू होत एसटी सुरळीत कशी चालेल, हे पाहावे, असेही पवार यांनी म्हटले.

कृती समिती आणि कामगार समितीचे जेवढे प्रतिनिधी आहेत, त्यांचा कामगारांच्या हिताबद्दलचा जो अर्ज आहे, त्यात प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे याबाबत उल्लेख आहे. त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी राज्यातील एसटी कर्मचार्‍यांना कामावर येण्याचं आवाहन केलंय, ही आनंदाची बाब असल्याचं पवार म्हणाले. आम्ही कामगारांच्या समस्या मनावर घेणार नाही, असा समज काही लोकांनी पसरवला होता, त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे हा संप सोडवायला दोन महिने लागले. अन्यथा एवढा वेळ लागलाच नसता. तसेच आम्ही हा संप सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत, असं शरद पवारांनी सांगितलं.

Exit mobile version