लालपरीचा प्रवास महागणार; प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री

डिझेल दरवाढीचा परिणाम; भाडेवाढीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव
किमान पाच रुपयांनी होणार वाढ
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सतत होणारी डिझेल दरवाढ, कोरोनामुळे कमी झालेले प्रवासी उत्पन्न आणि महागाई भत्त्यासह अन्य खर्चात झालेली वाढ, यामुळे एसटीवर आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळे कोरोनाकाळात सर्वसामान्यांना आधार ठरलेल्या लालपरीचा अर्थात एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. परिणामी, यावर तोडगा काढण्यासाठी एसटी प्रशासनानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. पुढील काही दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.एसटी प्रशासनाला डिझेल खर्चावर दरमहा सुमारे 120 ते 140 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे.

कोरोना काळात एसटीची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे तोट्यात भर पडत आहे. महामंडळाच्या सुमारे 16 हजार बस डिझेलवर धावतात. यात पूर्ण क्षमतेने सेवा सुरू झाल्यास रोज 12 लाख 500 लीटर डिझेलचा वापर होतो. सध्या ही गरज आठ लाख लीटर इतकी आहे. त्यामुळे प्रवासी भाडे वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे.

एसटी प्रशासनाने राज्य सरकारकडे 17 टक्क्यांपर्यंत भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला असून, किमान भाडेवाढ 5 रुपये असेल. लवकरच राज्य सरकार व एसटी महामंडळाकडून यावर अंतिम निर्णय होणार आहेत. एसटीची भाडेवाढ सहा किलोमीटरच्या टप्प्यानंतर होते. एसटी प्रशासनाच्या प्रस्तावानुसार, साध्या गाडीचे दर हे नऊ किलोमीटरपासून पुढे वाढणारे आहेत. 100 किलोमीटरपर्यंत साधारण 20 ते 25 रुपयांची वाढ होणार असून, त्यापुढील प्रवासासाठी प्रवाशांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. कमी अंतरावर जास्त वाढ नसेल. वातानुकूलित बसगाड्यांच्या दराच्या वाढीचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे.

महामंडळाच्या सुमारे 16 हजार बस डिझेलवर धावतात. यात पूर्ण क्षमतेने सेवा सुरू झाल्यास रोज 12 लाख 500 लीटर डिझेलचा वापर होतो. सध्या ही गरज आठ लाख लीटर इतकी आहे. त्यामुळे प्रवासी भाडे वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version