| उज्जैन | वृत्तसंस्था |
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली आहे. त्याचबरोबर वर्षांतून एकदाच उघडण्यात येणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिरातही दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली. दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात बॅरिकेट्सजवळ गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली. त्यामुळे मंदिर परिसरात चेंगराचेंगरी परिस्थिती झाली. या घटनेने नागपंचमी सणाला गालबोट लागल्याचे बोललं जात आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेने अनेक भाविकांची तब्येत बिघडली. अनेक भक्त बेशुद्ध झाल्याचेही समोर आलं. मंदिरात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयातही दाखल केलं आहे. आतापर्यंत या घटनेत 13 भाविक जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. श्रावणा महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भगवान महाकाल यांच्यासोबत नागचंद्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या मंदिरात सकाळपासून 5.50 लाख भाविकांनी दर्शन घेतलं आहे. त्यात नागचंद्रेश्वर मंदिर हे वर्षातून एकदाच उघडले जाते. त्यामुळे दरवर्षी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उज्जैनला येतात.






