। आंध्रप्रदेश । वृत्तसंस्था ।
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी झाली. यात नऊ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
आंध्र प्रदेशमधील हा अपघात कार्तिक महिन्यातील एकादशीच्या पवित्र प्रसंगी घडला. मंदिरात सकाळपासूनच गर्दी लक्षणीयरीत्या वाढली होती आणि पुरेशा सुरक्षा व्यवस्थेअभावी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दीचा दबाव वाढला. ज्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. यावेळी अनेकजण खाली कोसळले आणि त्यांच्या अंगावरुन अनेकांनी जाण्यास सुरुवात केली. यात नऊ भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर कडक नजर ठेवली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.





