। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
काही दिवसांपूर्वी रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला होता. त्यात तो केकेआरचे प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत काही वैयक्तिक चर्चा करताना दिसत होता. आयपीएल ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’ यांनी दाखवलेल्या या व्हिडिओमुळे विविध चर्चांना उधाण आले होते. रोहित पुढच्या हंगामात केकेआरमध्ये जाणार का? अशा चर्चा देखील सर्वत्र होऊ लागल्या होत्या. त्यामुळे रोहित खूप चिडला होता.
19 मे रोजी रोहितने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत स्टार स्पोर्ट्सला फटकारले होते. विरोध करूनही चॅनलने त्याचा वैयक्तिक व्हिडिओ प्ले केल्याचे रोहितेने म्हटले होते. आता यावर स्टार स्पोर्ट्सने उत्तर दिले आहे. चॅनलने एक निवेदन जारी करत म्हटले की, भारताच्या एका सीनियर खेळाडूच्या क्लिपची कालपासून सोशल मीडियावरती खूप चर्चा होत आहे. ही क्लिप 16 मे रोजी वानखेडे स्टेडियमवरची आहे. ही क्लिप सरावादरम्यान रेकॉर्ड केली होती. असे करण्यासाठी स्टार स्पोर्ट्सकडे अधिकार आहेत. व्हिडिओमध्ये एखादा सीनियर खेळाडू त्याच्या मित्रांसोबत गप्पा-गोष्टी करताना दिसतो. या व्हिडिओ क्लिपमध्ये आम्ही कोणताही ऑडिओ रेकॉर्ड केलेला नाही. तसेच, तो कोणत्याही लाईव्ह टीव्हीवरती दाखवला देखील नाही. आम्ही जगभर क्रिकेटचे प्रक्षेपण करत असताना सर्व नियमांचे पालन करतो.