ना.ना. पाटील यांच्या नावाने शेतकरी सन्मान पुरस्कार सुरू करा

रमेश भोईर यांची सरकारकडे मागणी

| मुंबई | प्रतिनिधी |

कुळ कायद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे नारायण नागो पाटील यांच्या कार्याला योग्य न्याय मिळावा, यासाठी समाजसेवक रमेश भोईर यांनी पुढाकार घेत राज्य सरकारकडे महत्त्वपूर्ण मागण्या लावून धरल्या आहेत. मंत्रालयात तैलचित्र, शालेय अभ्यासक्रमात धडा आणि त्यांच्या नावाने शेतकरी सन्मान पुरस्कार सुरू करण्याची आग्रही मागणी भोईर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

थोर लोकनेते नारायण नागो पाटील यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गणेश नगर येथील आगरी समाज नेते व समाजसेवक रमेश भोईर यांनी ठोस पाऊल उचलले आहे. शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी आयुष्य वेचलेल्या या नेत्याला मरणोत्तर योग्य सन्मान मिळावा, यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू केला आहे.

भोईर यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये नारायण नागो पाटील यांच्या नावाने राज्यस्तरीय ‌‘शेतकरी सन्मान पुरस्कार‌’ सुरू करणे, शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या जीवनकार्याचा समावेश करणे आणि मंत्रालयात त्यांचे तैलचित्र सन्मानपूर्वक बसवणे या मुद्द्यांचा समावेश आहे.

या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी भोईर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून, या उपक्रमाला राज्यातील अनेक आमदार व खासदारांनीही पाठिंबा दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version