पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्यावतीने निवेदन
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे सर्व्हर गेल्या 22 दिवसांपासून डाऊन असल्याने धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. याचा मोठा फटका तालुक्यातील शेकडो शिधापत्रिकाधारकांना बसला आहे. या शिधापत्रिकाधारकांना दोन दिवसात ऑफलाईन पध्दतीने धान्य वितरण करुन दिलासा द्यावा याकरिता पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच मुरुड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
मुरूड तालुक्यात 17 हजार 275 शिधापत्रिकाधारक आहेत. यांना आपण ऑनलाईन पद्धतीने महिन्याला महिना धान्य वितरण केले जाते. महिना संपला तरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप झालं नाही. सध्या पावसाचे दिवस आहेत. आदिवासी पाड्यातील आदिवासी महिला व इतर पुरुष महिला धान्य घेण्यासाठी रेशनिंग दुकानावरुन धान्य न घेता परत परतावे लागत आहे. काही वयोवृद्ध महिला पुरुष रेशनिंग घेण्यासाठी रिक्षाने येत असतात परंतु व धान्य न मिळाल्यामुळे रिक्षा भाडे अंगावर पडत असल्याने याठिकाणी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. बोलण्याचे तात्पर्य एकच आहे. इतके दिवस झाले कुठल्याही अधिकार्यांनी याकडे लक्ष दिले नाही तरी त्यातून काही तरी मार्ग काढावा, ऑनलाईन पध्दतीने होत नसेल तर ऑफलाईन पध्दतीने धान्य वाटप करावे तसे निर्देश तहसीलदारांना सूचना द्याव्यात. येत्या दोन दिवसात शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण झालं नाही तर नाईलाजाने जनतेसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल, असा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी दिला.