सुधागडात धान्य वितरणात अडचणी
मशीन शासनाकडे जमा करण्याचा इशारा
। राबगाव/पाली । वार्ताहर ।
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत तालुक्यातील रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात खोळंबा निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार नेट अभावी बंद असल्याने धान्य वितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी शिधापत्रिकधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर धान्य वेळेवर न मिळाल्याने दुकानदार आणि शिधापत्रिकाधारक यांच्यात भाडणे देखील होत आहेत. चुकी शासनाची मनस्ताप मात्र दुकानदारांना सहन करावा लागत आहे.
ई-पॉस मशिनला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने सारे मुसळ केरात गेले आहे. त्यामुळे अनेक शिधापत्रिकाधारकांना रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील बहुतांश दुकानांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. अनेक शिधापत्रिकाधारकांच्या बोटाचे ठसे ई-पॉस मशिनवर उमटत नसल्यामुळे त्यांना धान्याच्या लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. ई-पॉस मशिनवर ग्राहकांचे ठसे घेण्याकरिता दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाकडून ऑनलाईन धान्य वितरणाची राबविण्यात येत असलेली योजना शिधापत्रिकाधारकांच्या फायद्याची असली तरी ई-पॉस मशिनवर उमटत नसलेले बोटाचे ठसे आणि वारंवार ई-पॉस मशिन बंद पडत असल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्याच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाने उपाययोजना करुन सुधागड तालुक्यातील रास्तभाव दुकानांमधील वारंवार बंद पडणार्या ई-पॉस मशिन तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान, रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने मशीन तातडीने दुरुस्त करण्यात याव्या, अन्यथा ई-पॉस मशिन जिल्हा पुरवठा विभागाकडे परत करण्यात येणार असल्याचा इशारा रास्तभाव दुकानदार संघटनेच्यावतीने पाली तहसीलदार मार्फत जिल्हा पुरवठा अधिकार्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या सर्व अडचणी शासन दरबारी नोंदविण्या करिता सुधागड तालुका रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने दि.4 एप्रिल रोजी सुधागड तालुका तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुधागड तालुका रास्त भाव संघटनेचे अध्यक्ष अनुपम कुळकर्णी, पीठू डूमणा, चंद्रकांत घायले, अतुल मुजुमदार, अरविंद फणसे, सुरेश दंत आदीसह तालुक्यातील दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात अडचणी येत आहेत. मात्र आम्ही विक्री रजिस्टर वरून नोंदी ठेवून कार्ड धारकांना धान्य वितरण सुरू ठेवणार आहोत. मात्र ई-पॉस मशिन तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.
– अनुपम कुळकर्णी, अध्यक्ष रास्त भाव दुकानदार संघटना, सुधागड तालुका