| अलिबाग | भारत रांजणकर |
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज धाड टाकली असून त्यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या किहीम येथील जागेसह अलिबाग तालुक्यातील एकूण आठ प्लॉट जप्त केले आहेत. खासदार संजय राऊत याच्यावर झालेली ही कारवाई त्याच्यासाठी अडचणीची ठरणार आहे. मात्र आगरसुरे येथे असलेल्या राऊत याच्या बंगल्यावर ईडीने कारवाई केल्याचे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र या कारवाईने रायगडात चर्चेला उधाण आले आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना यापुर्वीच ईडीकडून अटक करण्यात आली आहे. प्रविण राऊत यांनी दिलेल्या कबुलीत अन्य धागेदोरे ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे थेट दिल्लीतून ईडीची 20 जणांची टीम रायगड व ठाणे भागात दाखल झाली होती.
मुख्यमंत्री याचे मेव्हणे श्रीधर पाटणकर याच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत याच्यावर ईडीने आता मोर्चा वळवला आहे. किहीम येथे राऊत याच्या पत्नी वर्षा राऊत आणि सुषमा पाटकर याच्या नावे 22 गुंठे जमीन आहे. या जमिनीत काही नारळाची झाडे आणि विहीर आहे. याच जागेवर आज सकाळी ईडीचे पाच ते सहा जणांचे एक पथक कारवाईसाठी गेले होते. या जागेवर जाऊन पथकाने पाहणी करून निघून गेले असल्याचे समजते. आगरसुरे येथे खासदार राऊत याचा बंगला आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई अद्याप ईडीकडून झालेली नाही. खासदार संजय राऊत याच्यावर झालेली ईडीची कारवाई ही एक मोठी घटना आहे. त्यामुळे पुढील काळात राऊत याच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.