शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थी वेगवेगळे क्रीडा प्रकार खेळण्यामध्ये रमली आहेत. वैयक्तिक खेळापासून सांघिक खेळ शाळांमध्ये होत असल्याने त्याचा आनंद लुटला जात आहे.विद्यार्थ्यांची बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी क्रीडा स्पर्धा डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु करण्यात आल्या आहेत. गोळाफेक, कुस्ती, धावणे, कबड्डी, खो – खोसारखे अनेक खेळ शाळांमध्ये खेळविले जात आहे. वेगवेगळ्या वर्गातील खेळाडूंमध्ये स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून शाळांमध्ये खेळ घेतले जात आहेत. खेळ पाहण्याबरोबरच खेळणाऱ्यांची संख्यादेखील अधिक असल्याचे पहावयास मिळत आहे. मोबाईलच्या युगात फ्री फायर, लुडो अशा खेळांमध्ये रमणारी पिढी मैदानी खेळातही रमली आहे. शाळेतील शिक्षकांकडूनदेखील विद्यार्थ्यांना खेळाबाबत प्रोत्साहन दिले जात आहे. खेळात प्राविण्य मिळविलेल्या संघाला व खेळाडूला शाळेकडून बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे. 20 डिसेंबरपर्यंत स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. त्यानंतर शाळांमध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

Exit mobile version