माथेरानमध्ये रोप-वे सुरु करा- आ. जयंत पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

माथेरान हे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे या शहराच्या विकास आणि पर्यटन वाढीसाठी योग्य दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. माथेरानमधील पर्यटन वाढण्यासाठी पर्यायी मार्गाची गरज असून याठिकाणी रोप-वे सुरु करण्यात यावी, अशी मागणी शेकापचे आ. जयंत पाटील यांनी केली आहे. बुधवारी (दि.24) त्यांनी याबाबत सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला.

यापुढे आ. जयंत पाटील यांनी सांगितले की, माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारचे वाहन नेण्यास बंदी असताना या ठिकाणी पर्यटन वाढावे या दृष्टिकोनातून रोप-वे ची सुविधा असणे गरजेचे आहे. त्यासाठी एम.एम.आर.डी.ए.ला 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे, हे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी आणि त्यामधून चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी हा प्रकल्प एम.एम.आर.डी.ए. च्या माध्यमातूनच पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली.

रोप-वे सुरु झाल्यास पनवेल, मुंबईतील पर्यटकांना अगदी कमी वेळात माथेरानला पोहोचणे शक्य होईल. याशिवाय परदेशातील पर्यटकांची संख्याही वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

अनेक प्रकल्प रखडले
राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून होत असलेली कामे सभागृहात चर्चा करून एम.एम.आर.डी.ए.कडे सुपूर्द करण्यात आली होती. परंतु हीच कामे पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे गेल्याने अनेक प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेले नाहीत.

त्यावर शंभुराजे देसाई म्हणाले, वणी येथे सुरु केलेल्या युनिक्यूलर रेल्वेप्रमाणे माथेरानमध्ये आधुनिक युनिक्यूलर रेल्वे सुरु करण्याबाबत 2019 मध्ये केंद्र सरकारच्या राईट्स या कंपनीकडे अहवाल बनविण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्यावेळी वणीच्या धर्तीवर माथेरानमध्येही ही रेल्वे सुरु करण्याबाबत सकारात्मक उत्तर मिळाले होते. त्यामुळे या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या. मात्र 2021 मध्ये केवळ एकच निविदा आल्याने बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा, या तत्वावर विचार सुरु आहे. दोन्हा बाजू तपासून घेतल्या जातील. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.

Exit mobile version